*मनरेगाच्या माध्यमातून भरीव काम करावे—जिल्हाधिकारी–डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार*

2

1

बुलडाणा, दि‍. 11 - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटचा घटक असलेल्या गरीब, आर्थिक दुर्बलांच्या आयुष्यात संपन्नता आणता येणे शक्य आहे. यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सक्षम मनरेगा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटनीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, अमरावतीचे कार्यकारी अभियंता असलम खान, कृषी सहसंचालक कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहायक किशोर चावंदे, नरेगा गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. सक्षम मनुष्यबळाचा उपयोग करून ‘माथा ते पायथा’ जलसंधारण कामांचा अवलंब करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, मनरेगामधून पाणी अडविता येण्याजोग्या ठिकाणांचा शोध घेवून त्याठिकाणी जलसंधारणाची कामे घ्यावीत.  हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. आपल्याला या बदलाची जाणीवसुद्धा होत आहे. अशा परिस्थितीत पावसाळा अनियमित व अवेळी स्वरूपाचा होत आहे. या परिणामांपासून समाजाचा बचाव करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. मनरेगामधून ही काम करता येणार आहे.  याप्रसंगी दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. देशमुख यांनी केले. कार्यशाळेला तहसीलदार, रोहयो विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

– 

-->