*पात्र व तरूण मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – विभागीय आयुक्त*

news1

news1

बुलडाणा, दि‍. 7 – लोकशाहीमध्ये निवडणूका अत्यंत महत्वाची भूमिका बजावित असतात. निवडणूक ही लोकशाहीचा आत्मा आहे. ज्याप्रमाणे लोकशाहीसाठी निवडणूक महत्वाची, त्याप्रमाणे निवडणूकीकरीता मतदार यादी महत्वाची असते.  भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम  जाहीर केला आहे. त्यानुसार तरूण पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यात येत आहे. प्रत्येक तरूण पात्र मतदाराने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त्‍ पियुष सिंग यांनी केले आहे. मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे, उपजिल्हाधिकारी श्री. कुळकर्णी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिमांचे आयोजन करून मतदार जागृती करण्याच्या सूचना करीत विभागीय आयुक्त म्हणाले, महाविद्यालयांमधून तरूण व पात्र मतदारांची नोंदणी करावी. मतदार यादीतून नाव वगळणे, मतदार यादीवरील दावे व हरकती घेणे, नाव समाविष्ट करणे आदी कामे मोहीम काळात करण्यात येणार आहे. बीएलओ यांनी मतदारांचे फॉर्म भरून घ्यावेत. दोन ठीकाणी नावे असल्यास एक नाव स्वत:हून रद्द करावे. मतदारांच्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर संपर्क यंत्रणेची स्थापना करण्यात यावी. राज्यात 5 जानेवारी 2018 पर्येत ही मोहीम राबविल्या जात आहे. तरी तरूण व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनीही सूचना केल्या. बैठकीत माहीती उपजिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात 1991 बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महसूल, ग्रामविकास, आरोग्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

असा आहे संक्षीप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 3 नोव्हेंबर 2017 पर्यंत, मतदार यादीतील संबंधीत भागाचे, सेक्शनचे ग्रामसभा व स्थानिक स्वराज्य संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूएसोबत बैठक , नावांची खातरजमा करणे 13 ऑक्टोंबर  रोजी, विशेष मोहिमांचे आयोजन 8 व 22 ऑक्टोंबर रोजी,  दावे व हरकती निकालात काढण 5 डिसेंबर पर्यंत, डाटाबेसचे अद्ययावतीकरण 20 डिसेंबर पर्यंत, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2018 रोजी.

-->