*मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणणार– उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे* * जिल्ह्यात 203 कोटी रूपयांची कामे पूर्ण, 197 कोटी रूपयांच्या कामांचे भूमीपुजन*जिल्ह्यातील वीज वहन यंत्रणा सक्षम करणार* महापारेषण व महावितरणच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमीपुजन*

13

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणणार——--         उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

@   जिल्ह्यात 203 कोटी रूपयांची कामे पूर्ण, 197 कोटी रूपयांच्या कामांचे भूमीपुजन@

@जिल्ह्यातील वीज वहन यंत्रणा सक्षम करणार@

@ महापारेषण व महावितरणच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमीपुजन@

4

बुलडाणा, दि. 25 : शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. शेतीला मुबलक पाणी व त्यासोबतच वीज देवून शेतीचे उत्पन्न शाश्वतरित्या वाढविता येते. राज्यात शेतकऱ्यांना पारंपारिक वीजेऐवजी सौर उर्जेसारख्या अपारंपारिक उर्जा स्त्रोतांमधून वीज देण्यावर शासन कार्य करीत आहे. त्यासाठी शासन 2 हजार शेतकऱ्यांना एका वीज वाहिनीवर आणून ही वाहिनी सौर उर्जेवर चालणाऱ्या फिडरला जोडण्यात येणार आहे. ही कामे राज्यात लवकरच आणण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतंर्गत करण्यात येणार आहे, असे प्रतीपादन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. महावितरणच्या बुलडाणा मंडळ कार्यालयाच्या विद्युत भवन आवारात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्यावतीने 33 के.व्ही उपकेंद्र भूमीपुजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, शशीकांत खेडेकर, आकाश फुंडकर, संजय रायमूलकर, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती श्वेता महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, कृउबासचे सभापती जालींधर बुधवत, महातविरणचे प्रादेशिक संचालक प्रसाद येरमे, मुख्य अभियंता अरविंद भादीकर, महापारेषणचे संचालक रविंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्ह्यात 203 कोटी रूपयांच्या कामे पूर्ण केली असल्याचे सांगत उर्जामंत्री म्हणाले, वीज वहन क्षमता सक्षम करण्यासाठी जिल्हाभरात 197 कोटी रूपयांचे कामांचे भुमीपूजन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण गरजेसाठी अजूनही 345 कोटी रूपयांची गरज आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात 3 लाख वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. अजूनही प्रलंबित कृषी वीज पंप वीज जोडण्यांचा अनुशेष दूर केल्या जात आहे. ज्या ग्रामपंचायत किंवा नगर पालिकेला स्वतंत्र लाईनमन पाहिजे असल्यास गावातीलच आयटीआय, तंत्रनिकेतनमधून इलेक्ट्रिक क्षेत्राशी निगडीत ट्रेड झालेल्या मुलाला वीज व्यवस्थापक म्हणून घेता येणार आहे. त्याला नऊ रुपये प्रति घराप्रमाणे पैसे देण्यात येणार आहे. तसेच लाईनमन आपल्या कार्यक्षेत्रातील पोलवर अन्य व्यक्तीला काम करायला लावत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये जर सदर व्यक्ती पोलवर चढून अपघात झाल्यास त्या व्यक्तीच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधीत लाईनमनवर दाखल करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाने गौरविलेले महावितरणचे मोबाईल ॲप आपण विकसित केले आहे. या ॲप्सद्वारे मीटर रिडींग, बिलींगसंदर्भातील तक्रारी येत नाहीत. महिन्याच्या 30 तारखेला आपल्या मीटरच्या रिडींगचा फोटो काढून ॲप्सवर अपलोड केल्यास प्रत्यक्षात असलेल्या रिडींगचेच देयक येईल. देयक अदा करण्याची सुविधाही या ॲप्सवर आहे. त्यामुळे या ॲप्सचा अधिकाधिक उपयोग नागरिकांनी करावा. चांगले काम करण्याच्या सरकार पाठीशी असून कामचूकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासही शासन मागे-पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी प्रास्ताविक केले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील ग्राम सभेच्या माध्यमातून तयार केलेल्या वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या आराखड्यानुसार काम करण्याची मागणी केली. रविकांत तुपकर म्हणाले, वीज वितरण, पारेषण व निर्मिती या तिन्ही बाबींवर शासन भक्कमपणे कार्य करीत आहे. शेतकरी वर्गाच्या  वीज विषयक समस्या सोडविण्यात येत आहेत. आमदार शशीकांत खेडेकर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रातिनिधीक स्वरूपात उर्जामंत्री यांनी कुदळ मारून भूमीपुजन केले. तसेच कोनशिलांचे अनावरण केले. संचलन सहायक अभियंता गणेश बंगाळे यांनी केले. कार्यक्रमाला अधिक्षक अभियंता श्री. कडाळे, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, लोकप्रतिनिधी,  महावितरचे कर्मचारी, जनसंपर्क अधिकारी श्री आडे, आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

33 के.व्ही उपकेंद्रांचे भूमीपुजन व लोकार्पण

लोकार्पण झालेली 33 के.व्ही उपकेंद्र : इसरूळ  ता. चिखली, शेंदूर्जन ता. दे.राजा, जांभूळधाबा ता. मलकापूर, ढोरपगांव ता. खामगांव, पिंपळगांव उंडा ता. मेहकर, कळंबेश्वर ता. मेहकर, भालेगांव ता. मेहकर, नारायणखेड ता. दे.राजा, उमापूर ता. जळगांव जामोद, वाघजळ ता. मोताळा, पळशी बु ता. खामगांव, महारखेड ता. सिंदखेड राजा.

भूमीपुजन झालेली 33 के.व्ही उपकेंद्र : सोयगांव ता. बुलडाणा, पेठ ता. चिखली, उंद्री ता. चिखली, देऊळगांव साकर्षा ता. मेहकर, लाखनवाडा ता. खामगांव, हरसोडा ता. मलकापूर, नारखेड ता. नांदुरा, करमोडा ता. जळगांव जामोद, खामगांव (वाडी) ता. खामगांव, मेहकर ता. मेहकर, जळगांव जामोद. या सर्व उपकेंद्रांचे एकाचवेळी भूमीपुजन व लोकार्पण करण्यात आले.

जनतेच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमानंतर जनतेच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यात आले. कृषी पंप वीज जोडणी, घरगुती वीज जोडणी, शेतात पोल टाकणे, वीज देयका संदर्भातील तक्रारी, निकृष्ट कामे आदींबाबतीत प्राप्त तक्रारींवर निर्णय घेण्यात आले. याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि वीजेसंदर्भातील तक्रारी असल्यास 9096525512 या क्रमांकावर एसएमएस करण्याचे आवाहन केले.

-->