*महीलांनो पुढे या, मतदार यादीत नांव नोंदवा-जिल्हाधिकारी* *जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम*

5

5

बुलडाणा,दि.8- स्त्री समाजाप्रती अतिशय महत्वपूर्ण भुमिका बजावत असते. समाजामध्ये महिलाशक्ती साक्षर असल्यास समाजाचा विकास साधल्या जातो. अशी साक्षर महिलाशक्ती समाजात मोठी जबाबदारी घेवून काम करीत असते. महिलाशक्तीची स्त्रीत्व, मातृत्वाची जाण अशा जागतिक महीला दिनाच्या कार्यक्रमांमधून व्हावी. या दिनाचे औचीत्‍य साधून महिलांमध्ये मतदार जागृती करण्यात येत आहे. महिलांनी पुढे येवून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ. विजय झाडे यांनी आज केले.    याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधि‍कारी दीपा मुधोळ, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती मिनाक्षी पवार, डॉ. इंदूमती लहाने, जात पडताळणी समिती उपायुक्त वृषाली शिंदे, समुपदेशक दिपाली राऊत आदी उपस्थित होते.   यावेळी मुख्य कार्यकारी दिपा मुधोळ मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,  महीलांनी स्वत:ला कमी न लेखता प्रत्येक क्षेत्रात आपल्या अस्तीत्वाची छाप पाडावी. मुलींची गर्भात होणारी हत्या थांबवावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जाणीव जागृती करावी. तसेच स्त्रीने कौटुंबीक जबाबदारी पार पाडुन सामाजिक कार्यात सुध्दा स्वत:ला झोकुन दयावे. इंदूमती लहाने यांनी यावेळी सांगितले, स्त्री आज स्त्रीत्वाची भुमीका पार पाडुन प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन कार्य करतांना दिसुन येते. ही समाजाला अभिमानास्पद बाब आहे.  उपआयुक्त जात पडताळणी समिती वृषाली शिंदे यांनी त्यांच्या जीवनातील काही अनुभव यावेळी कथन केले. त्या म्हणाल्या, स्त्रीयांनी संसार सांभाळत आपले ध्येय गाठावे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासनात यावे. स्त्री मुक्ती संघटनेच्या समुपदेशक दिपाली राऊत व तलाठी दुर्गा शेवाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.  उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रास्ताविकात मतदार जनजागृती तथा मतदार नोंदणी बददल माहीती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते मतदारांना मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले.    संचलन डॉ. गायत्री सावजी यांनी, तर आभार प्रदर्शन तहसिलदार दिपक बाजड यांनी केले. याप्रसंगी पंकज लध्दड अभियांत्रिकी व राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, तहसिल कार्यालयाचे कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालय तथा महसुल विभागाच्या महीला कर्मचारी, बीएलओ व आदी मान्यवर उपस्थित होते.

-->