*विभागीय सांस्कृतिक महोत्सवात सप्तसुरांची उधळण *सरस कलाभिव्यक्तीने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध*
बुलडाणा दि. 12 –
जिल्हा परिषदेच्या विभागीय क्रीडास्पर्धा व सांस्कृतीक महोत्सवाची पहिल्या दिवसाची संध्याकाळ ही सांस्कृतिक अभिव्यक्तिच्या रसात न्हाऊन निघाली. दिवसभर लालमातीच्या मैदानावर आलेला शीन स्पर्धकांनी सरस अशा भावगीत , भक्तीगीत, लोकगीत व सिनेगीत गायनाने दूर केला. तर समूह नृत्यामध्ये विविध जिल्ह्याच्या चमूंनी उपस्थित रसिकांनासुध्दा ताल व ठेका धरण्यास बाध्य केले. झालेल्या सांस्कृतिक महोत्सवाच्रूा पहिल्या दिवशी भक्ती गीत व भावगीत भावगीत , भक्तीगीत, लोकगीत व सिनेगीत गायन तसेच समूह नृत्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम , यवतमाळ व यजमान बुलडण्याच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. भावगीत-भक्तिगीत गायन प्रकारात अकोल्याच्या रामदास आत्राम यांनी अंदाज आरस्याच्या या भावगीताने रसिकांना स्थिर केले. तर अमरावती अनिल माकोडे यांनी सुर निरागस हो या गीताने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. यजमान बुलडण्याचे प्रतिनिधीत्व करणा-या सुनिल रेवेकर संत चोखेबांच्या जन्मभूमीत होऊ घातलेल्या या महोत्सवाचे औचित्य लक्षात घेऊन अबिर गुलाल उधळीत रंग या अभंगाच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसात चिंब न्हाऊ घातले. वाशिमच्या गजानन पाचरणे यांचे विठु माउली तू, माऊली जगाची हे गीत श्रोत्यांचे चित्तस्थावर करणारे ठरले. यवतमाळच्या दशरथ सुर्यवंशीच्या वृंदावणी वेणु वाजे या गीताने भाव अन भक्ति अपूर्व संगम घडविला.लोकगीत प्रकारात अकोल्याच्या गजानन शेगोकार यांनी गायलेल्या हुंडा नको मामा पोरगी द्या मला या धमाल लोकगीताने हुंडाच्या कुप्रथेचे आज समाजात झाालेले आधुनिकीकरण अधोरेखित करून उपस्थितांना अंतःर्मुख केले. या गाण्यावर रसिकांची पाऊले थिरकली मात्र हुंड्याची बदलती परिभाषा चिंतन करण्यासाठी मनावर कोरली गेली. अमरावतीच्या सुधाकर वाघमारे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावाकडे राहिली या क्रांतीकारी लोकगीत गायनाने रंग भरला. बुलडाण्याच्या प्रदिप इंगळे यांच्या संच्याने चल रे शिरप्या या गीताच्या स्वरांना मूकअभिनयाची जोड दिली. तर वाशिमच्या गजानन सोनुने यांनी सामाजिक प्रवाहात लोप पावत चाललेल्या वासुदेवाची परंपरा सामाजिक जाणीव-जागृतीसाठी कशी महत्वपूर्ण ठरू शकते हे अभिनयात्मक गाणे म्हणत समाजातील अनेक समस्यांना हात घालत त्यावर प्रहार केला. यानंतर यवतमाळच्या संतोष पठ्ठे यांनी सुध्दा लोकगीतगायनाचा आनंद व्दिगुणीत केला.
सिनेगीत स्पर्धेत देवानंद डोंगरे (अकोला),सोमेश्वर हरणे (अमरावती), प्रकाश झामरे( बुलडाणा),प्रमोद बदरखे (वाशिम), अमोल सांगळे (यवतमाळ) यांनी हिंदी चित्रापटातील उत्कृष्ट सिनेगीतं सादर करुन रसिकांची दाद मिळविली.यांनतर झालेल्या समुह नृत्यस्पर्धेत पाचही बुलडाण्याच्या मुरलीधर टेकाळेंनी बाजीराव पेशव्यांची भूमिका सादर करीत सादर केलेल्या मल्हारी या गीतावरील जोशपूर्ण समूहनृत्याने प्रेक्षकांच्या सांस्कृतिक महोत्सवाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या. अमरावती, अकोला, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांच्या चमूंनी सुध्दा एकापेक्षा एकएक सरस नृत्य सादर करुन रसिकांना उत्तररात्रीपर्यंत खिळवून ठेवले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी प्रत्येक कलाकारांना प्रतिसादर देत त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने , सामान्य प्रशासन विभागाचे उप. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे , पंचायत विभागाचे उप. मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.राजपूत , उप. मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद यादव, महिला व बाल कल्याण विभगाचे उप. मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी एन. के. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजीराव पवार , वरीष्ठ लेखाधिकारी सचिन ईगे , कृषी विकास अधिकारी रमेश भराड , लेखाधिकारी स्मिता तिमसे , पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल पसरटे , उपशिक्षणाधिकारी अनिल आकाळ , विविध विभागाचे अधिकारी –कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.